Friday 27 May 2011

पहिलीच भेट झाली..

मनात येणारं मळभ त्यागून मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार झाले. सुपारी फुटली आणि एका वेगळ्याच विश्वात पाऊल टाकल्याचे जाणवू लागले. तू आमच्या घरी फोन करायचास, पप्पाच उचलायचे. कधी कधी इकडचं तिकडचं खूप बोलून तुला ताटकळत ठेवायचे. मग शेवटी मला हाक मारुन माझ्याकडे रिसिव्हर सोपवायचे. एव्हाना तुझा गप्पांचा मूड गेलेला जाणवायचा. 'जेवण झालं का? काय खाल्लं?' असं फारच जुजबी बोलणं व्हायचं अन् तुझ्यामागे एसटीडीबूथ वर फोन करणारांची रांग 'बस्स झालं, ठेवा आता, किती बोलताय?' असं चेकाळू लागलेली मलाही ऐकू येऊ लागल्यावर लिँक तुटायची, हिरमोड व्हायचा.
आणि एके दिवशी तू आमच्या घरी आलास. काय बोलू, किती बोलू, किती किती पाहू, किती किती न्याहाळू असं होऊन गेलं होतं. एकांत नव्हता तरीही डोळे तुझ्याच नेत्रांचा ठाव शोधीत होते..
मी अबोली रंगाची छानशी साडी नेसलेली. साडीत मी फारच सुंदर दिसते, असं मैत्रिणी म्हणायच्या. जेवणं झाल्यावर आपण प्रथमच शेजारी शेजारी बसून फोटो काढून घेतले. आपला तो जोडा इतका छान दिसत होता ना, की बस्स! मी तर तुला प्राप्त करुन हरखूनच गेले होते बघ.
मग संध्याकाळी पप्पांची परवानगी घेऊन पिँट्याच्या हिरोहोंडा मोटरसायकलवर मला फिरायला नेण्याचा हट्ट तुजपाशी केला. त्याला हट्ट म्हणताच येणार नाही, कारण तुलाही तेच हवं होतं की काय, तू एकाच हाकेत तयार झालास. मी कपडे चेंज करुन ड्रेस परिधान केला व रेडी झाले.
आपण नदीकाठच्या रम्य घाटावर जायचे ठरवले. तसा तू आमच्या गावी एक वर्ष कॉलेजसाठी राहिला होतास. हे गाव तुला नवं नव्हतं, रस्तेही ठाऊक होते. प्रश्न होता तो गाडीचा. तू पुण्यात बजाज फोर एस चालवायचास अन् ही पिँट्याची हिरोहोँडा होती. हिचे गिअर मागे टाकावे लागतात हे तुला माहीत असावे बहुतेक, परंतु प्रत्येक गिअरवर तुझी फसगत होत होती. पुढे टाकू की मागे अशा द्वंद्वात गिअर चुकायचा अन् गाडी गचकन् आचका द्यायची, त्यासरशी मी तुझ्यावर मागून आदळायची! तुला तो स्पर्श मोहक जाणवायचा तर मला तुझा तो आगाऊपणा वाटायचा. मी ओरडलेही, 'अरे हळू हळू!' आणि पटकन जीभ चावली. मी तुला चक्क एकेरी संबोधत होते. पण तुला त्याचं काहीच वाटलं नाही, 'असू दे चालेल मला, फक्त चारचौघांत अरे तुरे करु नकोस.' तू अशी सोपी अट घातल्यावर मला स्वर्गही ठेंगणा वाटू लागला. कारण आपल्या एकांतात मी तुला 'अरे ऐकलंस का?' म्हणत शब्दशः अधिक जवळ येऊ शकणार होते!
नदीप्रवाहाचा मंजुळ नाद अन पाखरांची किलबिल वातावरण चैतन्यमयी करीत होती. संधिकालचा मंद प्रकाश आल्हाददायी होता. एकूणच रोमँटीक घडी होती.. घाटावर आपण दोघेच!
मी तुझ्या खांद्याची उशी करुन ते प्रेमील क्षण अंतरात साठवून ठेवित होते. त्या मंत्रमुग्ध संध्या समयी आपलं काय बोलणं झालं, मी तुला कोणते प्रश्न विचारले, तू काय उत्तरं दिलीस? यातील काही म्हणजे काहीच आठवत नाही बघ! तुलाच कदाचित स्मरत असेल कारण त्या प्रथमीच्या भेटीनंतर पाठविलेल्या लांबलचक पत्रात तू लिहिलं होतंस-
'बहाणा तूही केलास
मुंगी हटविण्याचा?
की माझ्या गालांवर
अधिकार सांगण्याचा,
की बहाणा तुझाच होता
हळुवार स्पर्शण्याचा!'
तुझी ती तरल कविता मी कितीदातरी वाचत राहिले. तुझ्या गालांवर चढलेली मुंगी मी झटकली असेलही, परंतु त्या कृतीला इतकं प्रेमळपणे शब्दबद्ध करणं मला जमलंच नसतं. तुझ्यातल्या कवित्वाचा हा अनोखा पैलू समोर आल्याने मी आणखीनच भावविभोर झाली होते.. तुझ्या आणखी निकट येत होते...

Wednesday 25 May 2011

प्रश्नच प्रश्न

तुझं माझं लग्न ठरण्याआधी कितीतरी प्रश्न माझ्यापुढे उभे ठाकायचे...
तू इथेच शहरात राहशील का? की सेटल्ड प्रक्टीस मोडून तुझ्या त्या भुक्कड गावात एकं दोनं करायला जाशील? मला तर तुझं ते अडनीड गावठाण ऐकूनच माहिती झालं होतं. त्या गावाचा महिमा बराच ऐकला होता. भामट्यांचं गाव आणि चोरांची वाडी असलेल्या त्या गावात पाण्यासाठी बोंबाबोंब चालते तर गल्लोगल्ली हागणदारीचा गंध दरवळत असतो. जिथे तिथे दारुभट्ट्यांचा उग्र वास आणि रसायनाचे मळीसारखे पाट वाहत वाहत सुकलेले दिसतात. व्यसनी दारुड्या गंजडी चोरांच्या अशा रोगी गावात मी राहणार कशी? तुझा मात्र एकच घोषा होता 'मी गावीच परतणार.' तुला समजवावं कसं? हा प्रश्न मला सतवायचा. तेव्हा मम्मी मला समजावयाची, 'अगं एकदा लग्न होऊन जाऊ दे तर खरं, मग तुला सांगते त्याचं मन कसं वळवायचं ते. पुरुषांना पटवायची युक्ती फार काही अवघड नसते.'
त्यातही पप्पांनी तुझ्या गावाकडच्या घराचं केलेलं वर्णन ऐकून तर माझा हिरमोडच झाला. तुझ्या त्या गळक्या पत्र्यांच्या एकेरी घरात मी कसा काय संसार करायचा? या प्रश्नाने मला नको नको केलं होतं. तुझ्या घरात ना बाथरुमची सोय होती ना संडासची. उघड्या न्हाणीत मी न्हाणार कशी? झाडा झुडपाआड, लपत छपत, लोटाभर पाण्यात प्रातःकालचा कार्यभाग उरकणं मला जमेलच कसं? हे प्रश्नसुद्धा मला भंडावून सोडायचे.
त्यात तुला एकूण तीन बहिणी! म्हणजे त्या तिघी व एक सासू अशा चार सासवांच्या सासूरवासापुढे मी एकटी कितपत तग धरू शकेल? दोन नणंदांची लग्न झालेली असली तरी त्या माहेरी आल्यावर त्यांच्या पोराबाळांची, पाहुण्यांची सरबराई माझ्याच्याने होईल का? त्या चौघीँचा जाच माझ्यासारख्या मानी स्वभावाच्या नोकरदार शिक्षिकेला सहन करता येईल का? अशा कितीतरी कारणांमुळे मी तुझ्या गावाकडे जाण्याच्या निर्णयाने प्रश्नांकित झाले होते.
त्यात तू एक डॉक्टर, मेडिकल फिल्डचा देखणा तरुण. तुला नक्की किती गर्लफ्रेन्ड होत्या किँवा असतील? मेडिकल कॉलेजची पोरंपोरी कशी वागतात हे मी जाणून होतेच. त्यामुळे हा शंकेखोर प्रश्नही मला चिँतातूर करायचा. डॉक्टरांवरील अनेक कथा कादंबऱ्‍या मी वाचलेल्या होत्या. काही आत्मचरित्रेही वाचलेली. त्यात वर्णन केल्याप्रमाणे तू काम केलेल्या हॉस्पिटलमधील नर्सेस, सिस्टर्स किंवा दायांशी रात्री अपरात्रीचे प्रसंग तुझ्याबाबत घडले असतील का? त्यातील एखाद्या तरुण नर्सच्या अंगाशी तू लगट केले असशील का? किँवा पूर्ण भूल दिलेल्या बेशुद्धावस्थेतील एखाद्या देखण्या युवतीवर तू...?
छे! छे! असं काहीच घडलेलं नसेल तर फार चांगलंच आहे. अशाप्रकारे स्वतःलाच समजावित मी निजण्याचा प्रयत्न करायची. कारण या प्रश्नांचं भेंडोळं मला सोडवताच येत नसे. एक प्रश्न उभा ठाकला की अनेक उपप्रश्नांचा गुंता निर्माण होई. हे 'पण परंतु किँतु'चे प्रश्न विचारावेत तरी कोणाला? हाही एक मोठ्ठा प्रश्नच होता. आणि तरीही मी सर्व प्रश्नांना शिरोधार्य मानून विवाहाचा हा आंधळा जुगार खेळण्यास तयार झालेच कशी? हा एक यक्षप्रश्न मला पडायचा, याला मात्र एकच उत्तर यायचं- तू मला मनापासून आवडला होतास!

Sunday 8 May 2011

तू अन् मी

तुझ्यासारख्या हुशार डॉक्टर मुलाने माझ्यासारख्या साध्या शिक्षिकेला एकदा पाहूनच पसंत कशी काय केली? हा प्रश्न मला आजही पडतो. तशी मी लाखात एक नसले तरी हजारांत उठून दिसणारी नक्कीच होते, आहेही आणि तू काय कमी हँडसम दिसत होतास, दिसतोसही.
मला तर तेव्हा वाटलं होतं की, हा स्वतः डॉक्टर असणारा मुलगा या मास्तरणीला होकार देणारच नाही, परंतु मी तुला आवडले होते.. तुझे डोळेच कौल देत गेले मला ते काय मला समजत नव्हतं? तुम्ही मला पहायला आला होता तेव्हा मी जेवणात स्वीट डिश म्हणून शिरा केला होता. मनात म्हटलं 'जर याने आणखी वाढलेला शिरा खाल्ला तर समजायचं याला आपण पसंत आहोत,' अन् तू माझा आग्रह न मोडता चक्क तीन वेळा शिरा घेतलास...
मग ही आर्या तुझी बायको म्हणून आली पण भार्या बनू शकली की नाही, हे आता तूच ठरवायचंस. पत्नीपण, आईपण निभावतांना मी काय सोसलं नि काय सोडलं, तुला माझ्याकडून काय मिळालं की मिळवावं लागलं याचा लेखाजोखा मांडण्याचा मानस बऱ्‍याच दिवसांनी असा फलद्रुप होतोय बघ.
या आत्मवृत्ताचं निवेदन मी तुझ्यापुढे नको करु तर कोणापुढे? कारण या आर्या'वृत्ता'मध्ये फक्त तुझं नि माझं विश्व वलयांकित करण्याचं मी ठरवलं आहे. लिखाण करायचं ठरतं पटकन परंतु ते पूर्ण करता करता उत्साह मावळू नये याची काळजी घ्यावी लागते. जसं की प्रत्येक नववर्षाला डायरी घेऊन जेमतेम जानेवारीच्या नव्याचे नऊ दिवस संपेतो खरडलं जातं. शब्द संपलेत असं वाटून आपोआप लेखणी कोपऱ्‍यात विसावते अन् डायरी शेवटपर्यंत कोरीच उरते. तसं या माझ्या ब्लॉगबाबत घडू नये म्हणून मी कंबर कसलीये! पेन शोधा, खरडे लिहिण्याकरिता पाठकोरे कागद जुळवा, शुद्धिचिकित्सा करुन फेअर प्रति तयार करा अन् ते बाड फडताळात सांभाळून ठेवा.. इतक्या उचापती करण्यापेक्षा ही अशी अनुदिनी टाईप करणं सोप्पं वाटतंय बघ.
मी मनमोकळं बोलायचं ठरवतेय खरं, पण ते मला कितपत जमेल शंका आहे, तरीही शुभस्य शीघ्रम्...
तुझ्या माझ्या दृढ नात्याचे कितीतरी भलेबुरे कंगोरे आता लिहायला बसल्यावर मजपुढे तरळू लागलेत बघ. त्यामध्ये प्रेम, प्रीति, शृंगार, तडजोड, हेवेदावे, भांडणं, माया, ममता, जिव्हाळा, लळा, धुसफूस, आरडाओरडा, आदळआपट, संशयकल्लोळ, चिडचिड, आजारपण, बेतलेले प्रसंग, पायघसरणं-पुन्हा सावरणं या सर्वांचं मुक्त चिँतन सामावलेलं आहे. या खाजगी गोष्टी चारचौघांत चर्वित बसण्याऐवजी लिहून ठेवाव्यात अन् निश्चिँत व्हावं असं मी आता मनोमन ठरवलंय बघ. तसं तू माझं मन माप ओलांडून आल्यापासून कधीच मोडलेलं नाहीये. त्यामुळे मी निर्धास्तपणे व तितक्याच बिनधास्तपणे मनांत साचलेली 'आर्या नावाची भार्या' व्यक्त करायचं धाडस करतेय. ती कितपत खरी उतरलीय हेही तूच समिक्षण करायचंस. मला ते मान्य असेल. अखेर काय तर तू अन् मी वेगळे का आहोत? आपण तर केव्हापासून एकरुपाने वावरुन घेतलं आहे. हो ना? मी लिहिलं काय नि तू लिहिलं काय शब्द थोडेफार इकडचे तिकडं होतील एवढाच काय तो फरक तुला जाणवेल. असो. तू म्हणजे मी आहे अन् मी म्हणजे तू. तू नि मी जणू ऊन सावलीचा खेळ, पाण्यात विद्रावीत झालेल्या अनेक घटकांसारख्या आपल्या भावना एकजीव झाल्यात. त्या बाजूला काढून त्यांची यथास्थित मांडणी करणे म्हणजे तुझ्यातल्या मी ला किँवा माझ्यातल्या तू ला वेगळं काढून चहूबाजूंनी न्याहाळणं होय. हे कठीण कार्य करण्याचं शिवधनुष्य मी पेलतेय की अर्ध्यातच त्यागतेय हे येणारे दिवसच ठरवतील...
तेव्हा वाट पहा, झाली एवढी प्रस्तावना पुरे. (मनात म्हणत असशील 'नाहीतरी तू जातीचीच बोलघेवडी आहेस, आता लेखघेवडी होशील इतकंच!' बघ बघ कसं हसू फुटलंय तुला...)