Friday 27 May 2011

पहिलीच भेट झाली..

मनात येणारं मळभ त्यागून मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार झाले. सुपारी फुटली आणि एका वेगळ्याच विश्वात पाऊल टाकल्याचे जाणवू लागले. तू आमच्या घरी फोन करायचास, पप्पाच उचलायचे. कधी कधी इकडचं तिकडचं खूप बोलून तुला ताटकळत ठेवायचे. मग शेवटी मला हाक मारुन माझ्याकडे रिसिव्हर सोपवायचे. एव्हाना तुझा गप्पांचा मूड गेलेला जाणवायचा. 'जेवण झालं का? काय खाल्लं?' असं फारच जुजबी बोलणं व्हायचं अन् तुझ्यामागे एसटीडीबूथ वर फोन करणारांची रांग 'बस्स झालं, ठेवा आता, किती बोलताय?' असं चेकाळू लागलेली मलाही ऐकू येऊ लागल्यावर लिँक तुटायची, हिरमोड व्हायचा.
आणि एके दिवशी तू आमच्या घरी आलास. काय बोलू, किती बोलू, किती किती पाहू, किती किती न्याहाळू असं होऊन गेलं होतं. एकांत नव्हता तरीही डोळे तुझ्याच नेत्रांचा ठाव शोधीत होते..
मी अबोली रंगाची छानशी साडी नेसलेली. साडीत मी फारच सुंदर दिसते, असं मैत्रिणी म्हणायच्या. जेवणं झाल्यावर आपण प्रथमच शेजारी शेजारी बसून फोटो काढून घेतले. आपला तो जोडा इतका छान दिसत होता ना, की बस्स! मी तर तुला प्राप्त करुन हरखूनच गेले होते बघ.
मग संध्याकाळी पप्पांची परवानगी घेऊन पिँट्याच्या हिरोहोंडा मोटरसायकलवर मला फिरायला नेण्याचा हट्ट तुजपाशी केला. त्याला हट्ट म्हणताच येणार नाही, कारण तुलाही तेच हवं होतं की काय, तू एकाच हाकेत तयार झालास. मी कपडे चेंज करुन ड्रेस परिधान केला व रेडी झाले.
आपण नदीकाठच्या रम्य घाटावर जायचे ठरवले. तसा तू आमच्या गावी एक वर्ष कॉलेजसाठी राहिला होतास. हे गाव तुला नवं नव्हतं, रस्तेही ठाऊक होते. प्रश्न होता तो गाडीचा. तू पुण्यात बजाज फोर एस चालवायचास अन् ही पिँट्याची हिरोहोँडा होती. हिचे गिअर मागे टाकावे लागतात हे तुला माहीत असावे बहुतेक, परंतु प्रत्येक गिअरवर तुझी फसगत होत होती. पुढे टाकू की मागे अशा द्वंद्वात गिअर चुकायचा अन् गाडी गचकन् आचका द्यायची, त्यासरशी मी तुझ्यावर मागून आदळायची! तुला तो स्पर्श मोहक जाणवायचा तर मला तुझा तो आगाऊपणा वाटायचा. मी ओरडलेही, 'अरे हळू हळू!' आणि पटकन जीभ चावली. मी तुला चक्क एकेरी संबोधत होते. पण तुला त्याचं काहीच वाटलं नाही, 'असू दे चालेल मला, फक्त चारचौघांत अरे तुरे करु नकोस.' तू अशी सोपी अट घातल्यावर मला स्वर्गही ठेंगणा वाटू लागला. कारण आपल्या एकांतात मी तुला 'अरे ऐकलंस का?' म्हणत शब्दशः अधिक जवळ येऊ शकणार होते!
नदीप्रवाहाचा मंजुळ नाद अन पाखरांची किलबिल वातावरण चैतन्यमयी करीत होती. संधिकालचा मंद प्रकाश आल्हाददायी होता. एकूणच रोमँटीक घडी होती.. घाटावर आपण दोघेच!
मी तुझ्या खांद्याची उशी करुन ते प्रेमील क्षण अंतरात साठवून ठेवित होते. त्या मंत्रमुग्ध संध्या समयी आपलं काय बोलणं झालं, मी तुला कोणते प्रश्न विचारले, तू काय उत्तरं दिलीस? यातील काही म्हणजे काहीच आठवत नाही बघ! तुलाच कदाचित स्मरत असेल कारण त्या प्रथमीच्या भेटीनंतर पाठविलेल्या लांबलचक पत्रात तू लिहिलं होतंस-
'बहाणा तूही केलास
मुंगी हटविण्याचा?
की माझ्या गालांवर
अधिकार सांगण्याचा,
की बहाणा तुझाच होता
हळुवार स्पर्शण्याचा!'
तुझी ती तरल कविता मी कितीदातरी वाचत राहिले. तुझ्या गालांवर चढलेली मुंगी मी झटकली असेलही, परंतु त्या कृतीला इतकं प्रेमळपणे शब्दबद्ध करणं मला जमलंच नसतं. तुझ्यातल्या कवित्वाचा हा अनोखा पैलू समोर आल्याने मी आणखीनच भावविभोर झाली होते.. तुझ्या आणखी निकट येत होते...

3 comments:

  1. khu chhan lihilay, mail madhun fwd aala ha lekh, shodh ghetala tar tumacha ahe.. khup mast... :)

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete