Sunday 12 June 2011

करार


करार...
तू माझ्याशी लग्न ठरवलंस, मग ह करार कशासाठी? म्हणजे मी कमावती असूनही तू हुंडा का मागावास? हे मला मुळीच पटलं नव्हतं. मी काही हेकणी नव्हते, चांगली देखणी होतेच की. का म्हणून तू व्यापार मांडलास? होय, मी तुलाच दोषी धरणार. कारण सर्व ठरवायला तूच होतास. तुला इतकंही कळू नये की आपली होणारी पत्नी सुशिक्षित आहे, पगारदार आहे, कमावती आहे. आपण कोणत्या तोंडाने येण्या-जाण्याचं भाडं, नवरदेवाचे कपडे, पाच तोळे सोनं, पंचवीस हजार वरदक्षिणा आणि लग्न करून देणे असाच करार केलास ना माझ्याशी? मी त्या रात्री पप्पांना किती ओरडले माहितीये का? म्हटलं, ‘तुम्ही तयारच का झाले इतकं सगळं द्यायला? मला काय दुसरी चांगली मुलं सांगून येत नव्हती का? या लालची लोकांपेक्षा कैक पटीनं मोठ्या मनाची मुलं भेटली असती. एवढा हुंडा द्यायला मी काय लुळीपांगळी आहे की आंधळी?’ आणि यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. निदान माझ्यापुढे तरी ते गप्प राहिले होते. जवळ जवळ पंधरा दिवस मी तुझ्यावर रुसून होते. मैत्रिणी समजावत, ‘जाऊ दे आर्या, आजकाल थोडंफार तरी देणंघेणं घेणं होतच असतं.’ मी उसळून म्हणे, ‘पण फक्त घेणंच का? देणं का नाही? त्यांनी आमच्याकडून फक्त घेतलं, असा करार केलाय. आणि मी हे विसरणार नाही. मी यातील पै अन् पै त्यांच्याकडून वसूल तर करणारच. शिवाय आयुष्यभर त्याला असा मुठीत ठेवीन ना की बस म्हटलं की बसलाच पाहिजे. नाही त्याला माझ्यापुढे हात पसरायला लावला तर नावाची आर्या नाही!’
माझी ती गर्जना ऐकून मैत्रिणी आता कसं होणार हिचं अशा मुद्रेने निरोप घेत. पण मी काही माघार घेतली नव्हती. ‘लग्न फक्त मलाच करायचं नाही, त्यांनाही करायचंच आहे की. मग सगळा भुर्दंड आम्हांला का? त्यांनी त्यांच्या खर्चानं यावं, त्यांचे कपडे त्यांनीच घ्यावेत, आम्ही पाच तोळे देणार तर त्यांनीही तितकेच सोने माझ्या अंगावर घालायला हवेत, वरदक्षिणा घेतली ना? मग वधुदक्षिणाही द्यावी. हा दुजाभाव का म्हणून?’ अशा मुद्देसूद चर्चेतून मी मला समजावू पाहणाऱ्यांना उलटं टांगत जायची! मला हे फक्त ‘देणं’ अजिबात पटलं नव्हतं. कधी एकदा तू तावडीत सापडतो अन् तुलाही चार शब्द सुनावतेय असं झालं होतं. आई मला शांत करायची- ‘अगं आर्या, काय तुझा वेडेपणा आहे हा? अगं तुझं चांगलं व्हावं म्हणून काहीही झालं तरी हे ठरत आलेलं लग्नं मोडायचं नाही असा विचार करूनच आम्ही त्यांच्या कडे सुपारी फोडायला गेला होतो. असा चांगला मुलगा, तोही डॉक्टर मिळाला असता का तुला? किती स्थळं येऊन गेलीत. काही विचार केला आहेस का तू? वय वाढल्यावर कोण पोरगा देईल?’ त्यवर मी चिडून बोलले- ‘तू गप्प बस हं मम्मी. मी काही एवढी म्हातारी झालेली नाहीये इतक्यात. अन् झाले तर झाले. मी माझ्या पायावर उभी आहे. मला चांगला दहा बारा हजार पगार मिळतो. पण मला एक कळत नाही, त्यांनी मागितले अन् तुम्ही लगेच द्यायला तयार झालात. का? काय आहे त्यांच्याकडं? गाडी? बंगला? नोकर चाकर? अगं ते एकदम भिकारी आहेत भिकारी. ना त्यांच्याकडे माझ्यासाठी एखादी सेपरेट खोली आहे, ना त्यांच्याकडे संडास बाथरूमची सोय आहे. आणि तरीही तुम्ही सगळ्या मागण्या कबुल करून आलात. छे! मला तुमचं हे वागणं पटलंच नाही. मी जर बैठकीत लग्न ठरवायला असते ना तर तिथल्या तिथे ठासून सांगितलं असतं, हुंडा घेणाऱ्याशी मी लग्न करणार नाही...’ माझ्या या जोरदार प्रतिकारानंतर तीही समजावून सांगणं सोडून देई.
परंतु मला ही गोष्ट स्वस्थपणे झोपू देत नसे. कधी वाटे- ‘आत्ताच नकार देऊन टाकावा. अशा मागतकरूंना जागीच नाही म्हणून केलेला करार तोडावा.’ नंतर विचार येई- ‘मग मम्मीपप्पांची किती नाचक्की होईल, ठरवलेलं लग्न मुलीनं नकार देऊन मोडलं, म्हणजे नक्कीच तिचं काहीतरी बाहेर कुठेतरी लफडं असणार, असा बभ्रा वाईट चिंतणारे लोक गावात पसरून देतील. काय करावं बरं?’ अशा चिंतेत रात्र सरत जाई...
तुझा नंतर फोन आला तरी मी फारशी बोलले नाही. ‘हो नाही’ इतकंच केलं. तुझ्यासारख्या स्वार्थी मुलाशी बोलण्याची इच्छाच नव्हती. मागाहून तुझं प्रेमळ पत्र आलं. त्यात ‘तू माझ्याशी बोलत का नाहीस?’ वगैरे प्रश्न होते. त्याचं पत्रोत्तर मात्र मी खरमरीत असंच दिलं. ‘माझ्या पप्पांकडून हुंडा घेतलातच का?’ असा सडेतोड प्रश्न त्यात होता. त्यावर तुझा मोठा मजेशीर जवाब आला- ‘अगं, सामाजिक प्रतिष्ठेसाठी हुंडा मागावाच लागतो. तुझ्या भावाच्या लग्नाच्या वेळी तुझे पप्पा देखील हुंडा घेतील की नाही बघ.’ परंतु माझं मात्र समाधान होत नव्हतं. फिरून मी तुला ऐकवी- ‘हुंडा न घेता सुद्धा तुम्हांला सामाजिक प्रतिष्ठा जपता आली असतीच की. आणि जर तुम्ही हुंडा मागितला नसता ना तर माझ्या पप्पांनी माझं सालंकृत कन्यादान केलं असतं, आहात कुठं? तुम्ही तो चान्स गमावलाय एवढं लक्षात घ्या. अहो मला नखशिखांत सोन्यानं मढवून तुमच्या घरी पाठवली असती त्यांनी. आता बसा पाच तोळेच मोजत. शंभर तोळ्याला तुम्ही मुकला आहात. आणि तुम्ही केलेला हा करार मी चांगलाच लक्षात ठेवणार आहे, समजलं? कवडी अन् कवडी वसूल केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. काय? आलं ना लक्षात?’
माझी ती धमकीवजा पत्रोत्तरं वाचून तुझी त्यावेळी कसली ओली अवस्था झाली असेल याची कल्पना करून मला माझ्याच मानी स्वभावाचं हसू येतंय आता!
त्यानंतर तू तुझ्या पत्रांतून प्रेमाच्या कवितांचा रतीबच घातलास आणि मी माझा ‘पण’ काही काळ विसरले. तुझ्या मोहक शब्दांत अडकले. मला माझ्या शपथेचा विसर पडत गेला. ‘चालायचेच, समाजाच्या माहितीसाठी घेतला असेल हुंडा.’ अशी समजूत घालून मी ती बाब स्वीकारली. तो करार मी मान्य केला अन् तुझ्या भेटीची आस घेऊन झोपी जाऊ लागले...

No comments:

Post a Comment