Sunday 8 May 2011

तू अन् मी

तुझ्यासारख्या हुशार डॉक्टर मुलाने माझ्यासारख्या साध्या शिक्षिकेला एकदा पाहूनच पसंत कशी काय केली? हा प्रश्न मला आजही पडतो. तशी मी लाखात एक नसले तरी हजारांत उठून दिसणारी नक्कीच होते, आहेही आणि तू काय कमी हँडसम दिसत होतास, दिसतोसही.
मला तर तेव्हा वाटलं होतं की, हा स्वतः डॉक्टर असणारा मुलगा या मास्तरणीला होकार देणारच नाही, परंतु मी तुला आवडले होते.. तुझे डोळेच कौल देत गेले मला ते काय मला समजत नव्हतं? तुम्ही मला पहायला आला होता तेव्हा मी जेवणात स्वीट डिश म्हणून शिरा केला होता. मनात म्हटलं 'जर याने आणखी वाढलेला शिरा खाल्ला तर समजायचं याला आपण पसंत आहोत,' अन् तू माझा आग्रह न मोडता चक्क तीन वेळा शिरा घेतलास...
मग ही आर्या तुझी बायको म्हणून आली पण भार्या बनू शकली की नाही, हे आता तूच ठरवायचंस. पत्नीपण, आईपण निभावतांना मी काय सोसलं नि काय सोडलं, तुला माझ्याकडून काय मिळालं की मिळवावं लागलं याचा लेखाजोखा मांडण्याचा मानस बऱ्‍याच दिवसांनी असा फलद्रुप होतोय बघ.
या आत्मवृत्ताचं निवेदन मी तुझ्यापुढे नको करु तर कोणापुढे? कारण या आर्या'वृत्ता'मध्ये फक्त तुझं नि माझं विश्व वलयांकित करण्याचं मी ठरवलं आहे. लिखाण करायचं ठरतं पटकन परंतु ते पूर्ण करता करता उत्साह मावळू नये याची काळजी घ्यावी लागते. जसं की प्रत्येक नववर्षाला डायरी घेऊन जेमतेम जानेवारीच्या नव्याचे नऊ दिवस संपेतो खरडलं जातं. शब्द संपलेत असं वाटून आपोआप लेखणी कोपऱ्‍यात विसावते अन् डायरी शेवटपर्यंत कोरीच उरते. तसं या माझ्या ब्लॉगबाबत घडू नये म्हणून मी कंबर कसलीये! पेन शोधा, खरडे लिहिण्याकरिता पाठकोरे कागद जुळवा, शुद्धिचिकित्सा करुन फेअर प्रति तयार करा अन् ते बाड फडताळात सांभाळून ठेवा.. इतक्या उचापती करण्यापेक्षा ही अशी अनुदिनी टाईप करणं सोप्पं वाटतंय बघ.
मी मनमोकळं बोलायचं ठरवतेय खरं, पण ते मला कितपत जमेल शंका आहे, तरीही शुभस्य शीघ्रम्...
तुझ्या माझ्या दृढ नात्याचे कितीतरी भलेबुरे कंगोरे आता लिहायला बसल्यावर मजपुढे तरळू लागलेत बघ. त्यामध्ये प्रेम, प्रीति, शृंगार, तडजोड, हेवेदावे, भांडणं, माया, ममता, जिव्हाळा, लळा, धुसफूस, आरडाओरडा, आदळआपट, संशयकल्लोळ, चिडचिड, आजारपण, बेतलेले प्रसंग, पायघसरणं-पुन्हा सावरणं या सर्वांचं मुक्त चिँतन सामावलेलं आहे. या खाजगी गोष्टी चारचौघांत चर्वित बसण्याऐवजी लिहून ठेवाव्यात अन् निश्चिँत व्हावं असं मी आता मनोमन ठरवलंय बघ. तसं तू माझं मन माप ओलांडून आल्यापासून कधीच मोडलेलं नाहीये. त्यामुळे मी निर्धास्तपणे व तितक्याच बिनधास्तपणे मनांत साचलेली 'आर्या नावाची भार्या' व्यक्त करायचं धाडस करतेय. ती कितपत खरी उतरलीय हेही तूच समिक्षण करायचंस. मला ते मान्य असेल. अखेर काय तर तू अन् मी वेगळे का आहोत? आपण तर केव्हापासून एकरुपाने वावरुन घेतलं आहे. हो ना? मी लिहिलं काय नि तू लिहिलं काय शब्द थोडेफार इकडचे तिकडं होतील एवढाच काय तो फरक तुला जाणवेल. असो. तू म्हणजे मी आहे अन् मी म्हणजे तू. तू नि मी जणू ऊन सावलीचा खेळ, पाण्यात विद्रावीत झालेल्या अनेक घटकांसारख्या आपल्या भावना एकजीव झाल्यात. त्या बाजूला काढून त्यांची यथास्थित मांडणी करणे म्हणजे तुझ्यातल्या मी ला किँवा माझ्यातल्या तू ला वेगळं काढून चहूबाजूंनी न्याहाळणं होय. हे कठीण कार्य करण्याचं शिवधनुष्य मी पेलतेय की अर्ध्यातच त्यागतेय हे येणारे दिवसच ठरवतील...
तेव्हा वाट पहा, झाली एवढी प्रस्तावना पुरे. (मनात म्हणत असशील 'नाहीतरी तू जातीचीच बोलघेवडी आहेस, आता लेखघेवडी होशील इतकंच!' बघ बघ कसं हसू फुटलंय तुला...)

No comments:

Post a Comment