Saturday 25 June 2011

लग्नाचा डामडौल..

तुझं माझं लग्न किती डामडौलात झालं हे का मी सांगायला पाहिजे. डॉक्टर जावई मिळाला म्हणून पप्पा भलतेच खूष होते. ते शिकले नाहीत परंतु आम्हां पोरांना त्यांनी शिकवलं. मी डी.एड. झाले अन् लगेच झेडपीत नोकरीला लागले. त्यात मला काही मुले पसंत पडत नव्हती. मास्तर पोरगा मला करायचा नव्हता. डॉक्टर किंवा इंजिनिअर मिळाला तर बहार येईल, असं मनोमन वाटत होतं. मुलं पाहण्यात वगैरे दोन वर्षे भुर्रकन निघून गेली. त्यानंतर मला लग्नच नको असं नैराश्य येऊ लागलं. मम्मी पप्पा चिंतेत होते. इतक्यात तू मला पाहून गेलास, पसंती कळविलीस, आणि सुपारीही फुटली. मग काय आमच्या घरातली लगीनघाई सांगू?
त्या दोन तीन महिन्यात पप्पांनी अक्षरशः पाण्यासारखा पैसा ओतला. घरात पाहिलंच लग्न, झोकात झालं पाहिजे, समाजात पत निर्माण झाली पाहिजे, लोकांनी तोंडात बोटे घालायला हवीत, पाहुणे तर हवेतच उडायला पाहिजेत अशी अनेक करणे त्यामागे होती. आणि तयारीही तशी सुरु झाली. दररोज रात्री बैठका होऊ लागल्या, नियोजने आखली जाऊ लागली, कितीतरी लोकांचा, पोरांचा राबता वाढला, घरगडी येऊ जाऊ लागले. बरीच कामे जाणकारांवर सोपवून पप्पा निश्चिंत मनाने पुढील व्यवस्था पाहू लागले.
आमचं होलसेल तसेच किरकोळ किरण मालाचे दुकान असल्याने गिऱ्हाईके अमाप लाभली होती. त्यातील बरीचशी ओळखीची आणि घष्टनीतली बनली होती. त्याचा फायदा आत्ता होत होता. लग्न म्हटल्यावर वधुपित्याला काय काय समस्यांना तोंड द्यावे लागते हे मी जाणून होते. परंतु पप्पांना काही पहावे लागले नाही. त्यांनी फक्त कामे वाटून दिली आणि ती मनाजोगी होत गेली...
आपलं लग्न अगदी राजेशाही थाटात होईल असं मलातरी कधीच वाटलं नव्हतं. परंतु पप्पांनी भलतंच मनावर घेत हे पहिलंच लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिलं. त्याचं वर्णन करण्याचा मोह आजही मला आवरता येत नाही बघ.
लग्नाच्या आठ दिवस अगोदरच गल्लीतल्या झाडून साऱ्या महिलांना बांगड्या भरण्याचा जाहीर कार्यक्रम झाला. तब्बल दहा हजार रुपयांच्या बांगड्या कुणी भरल्या असतील? चार दिवस आधीपासूनच जेवणावळी सुरु केल्या होत्या. एक मोठ्ठा हॉलच त्यासाठी बुक करून ठेवला होता. आज या बाजूचे लोक, उद्या त्या बाजूचे, परवा पलीकडचे असे चारही दिशांनी आमची गिऱ्हाईके विखुरलेली असल्याने दररोज किमान दोन हजार व्यक्तींच्या पंगती उठत होत्या. त्यामुळे अखेरपर्यंत मनुष्यबळ कमी पडलंच नाही. पप्पांचा वट जबरदस्त वाढला. कालपरवा पर्यंत क्षुल्लक किराणा दुकानदार समजले जात असलेले पप्पा एकदम प्रथितयश व्यापारी या गिणतीस पात्र झाले, इतकेच नाही तर त्यांच्या नावापुढे शेठ ही पदवी आपोआप लोकांच्या तोंडी येऊ लागली.
लग्नाच्या आदल्या रात्री तू आमच्या गावी आलास तर तुमचं स्वागत करायलाच पाचशे लोक अन् नातेवाईक उभे ठाकले होते यावरूनच पप्पांच्या दबदब्याची कल्पना यावी. लग्नाच्या दिवशी सकाळपासूनच गर्दी व्हायला लागली. लग्नासाठी प्रशस्त रंगमंदिर बुक करावं लागलं होतं. किमान पंधरा हजार लोक येतील अशी अपेक्षा होती. त्यामुळे मोठ्यात मोठं स्टेज असलेलं रंगमंदिर लग्नाच्या भव्यतेला शोभून दिसणार होतं.
सकाळी नऊ वाजता हळद लागली...
शे दोनशे बायकांनी मला हळदीची उटी लावून लावून पार माखून टाकली. तुझीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. तू तर पिवळाजर्द होऊन गेला होतास. इतक्या हातांनी हळद चोपडल्याने गालांवर हळदीची थप्पी जमा झाली होती. त्यानंतर आपल्याला साग्रसंगीत अंघोळ घालण्यात आली, तेथेही तेच. कितीतरी बायका व मुली मी मी म्हणत तांब्याभर पाणी आपल्यावर ओतण्यासाठी धडपडत होत्या. दहा वीस बादल्यांनी मी तर पहिल्यांदाच अंघोळ करीत होते. एक वेगळाच अनुभव येत होता...
त्यांनतर साखरपुडा झाला. त्यासाठीही जय्यत तयारी केली गेली होती. प्रत्येकाला नाश्ता म्हणून पोहे, सामोसे, वडापाव, उप्पीट काय लागेल ते हजर होते. पाहुणे मंडळी जाम खूष असल्याचे त्यांचे डोळेच सांगत होते. तू तर ह लग्नाचा डामडौल पाहून अचंबितच झालेला दिसत होता. साखरपुड्यानंतर जेवणावळीला जी सुरुवात झाली ती थेट संध्याकाळीच थांबली. विशेष म्हणजे कुठेही कमी पडलं नाही, इतका स्वयंपाक करण्यात आला होता. जेवणाच्या मेनूमध्ये पुऱ्या, बटाट्याची भाजी, वांग्याचं भरीत, मसाल्याचं वरण, साधं वरण, मसालेभात, साधा भात, पापड, लोणचे, कोशिंबीर, गुलाबजाम, जिलेबी, करंज्या, कुरडया, भजी... काय काय म्हणू नको, सर्व सर्व काही होतं. लोक भरपेट जेवली.
लग्नासाठी गोरज मुहूर्त काढला असल्याने वातावरण खूपच आल्हाददायक होतं. तू वरधाव्याला निघालास तेव्हा वाजन्त्रीची दोन पथके पुढे होती. त्यांच्या कोंडाळ्यात नृत्य करण्यासाठी स्थानिक मुलं मुली आणि तुझे मित्र वगैरे यांच्यात अहमहिका लागली होती. मिरवणूक हळूहळू पुढे सरकत होती आणि चौकाचौकात कोण हा भाग्यवान मुलगा म्हणून तुला पहायला व तुझ्यापुढे नाचायला जमलेली गर्दी दाटीवाटीने उभी होती. नाचणाऱ्या व्यक्तींना थम्सअप, कोकाकोला, मिरिंडा काय लागेल ते मिळत होतं. तुम्ही मनसोक्त नाचा, तुमचा शीण आम्ही घालवतो. असं धोरण पप्पांनी आयोजित केलं होतं. माझे दोन्ही भाऊ त्यावर देखरेख ठेवीत होते. कोणाला शीतपेय मिळालं की नाही ते आवर्जून विचारीत होते. अशी चंगळ मला नाही वाटत आमच्या गावात कधी कुणी केली असेल. प्रत्येक ठिकाणी भुईनळे, सप्तरंगी तोटे, फटाक्यांच्या लडी पेटवून दिल्या जात होत्या.
लग्नघटिका जवळ आली तरीही तुझा पत्ता नव्हता इतकी ती मिरवणूक रेंगाळत होती. अखेर मंडपाच्या दाराशी तू आलास. तुझं स्वागत करायला पुन्हा महिलांची झुंबड उडाली. प्रवेश द्वारापासून रंगमंदिरापर्यंत शामियाना उभारलेला होता. दोन्ही बाजूंनी गुलाबजलाचा सुगंधित शिडकावा करणारे पंखे भरारत होते. खाली मऊ पायघड्या होत्या. तुझं स्वागत पायघड्या घालून करावं असं पप्पांनी ठरवलंच होतं. प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला एका छोट्या वेलवेटच्या बटव्यात अक्षता व गुलाबपाकळ्या उधळण्यासाठी दिल्या जात होत्या. त्यासोबत एक कॅलेंडर दिले जात होते, ज्यावर आमच्या होलसेल वा किरकोळ दुकानाची आकर्षक जाहिरात केली होती. कित्येक हजार लोकांपर्यंत पप्पांचं नाव पोचणार होतं...
मुख्य स्टेजवर येतांना, मी व तू बरोबरीने चालत असतांना, सनईसुरात पावले टाकतांना कितीतरी नजरा आपल्यावर खिळल्या होत्या. मी तर पुरती हरखून गेले होते. आपल्या लग्नाला न भूतो न भविष्यति असा अलोट जनसागर लोटला होता. रंगमंदिरही अपुरे ठरले इतकी तोबा गर्दी उसळली होती. स्टेजच्या मागील भिंत तर पूर्णतः फुलांनी सजविलेली होती. त्यावर तुझं नी माझं नाव आकर्षक थर्माकोलने रेखलेलं होतं. ठरल्या मुहुर्तापेक्षा अर्धा तास उशीरा म्हणजे सात वाजून पस्तीस मिनिटांनी मंगलाष्टका सुरु झाल्या. त्या म्हणण्याकरिताही अनेकजण पुढे येतच राहिले. वीस पंचवीस मंगलाष्टका कुणाच्या लग्नात म्हटल्या गेल्याचं मलातरी आठवत नाही बघ. आणि ‘आता सावध सावध..’ सुरु केल्यावर तर सर्वजण उभे राहून टाळ्या पिटू लागले. आकाशात नयनरम्य आतषबाजी सुरु झाली. कितीतरी वेळ रात्रीच्या अवकाशात उंच जाऊन विखुरणारे फटाके उडत होते. आपल्या अंगावर अक्षता आणि गुलाब पाकळ्यांचा अक्षरशः वर्षाव होत होता. आपल्याला भेटी द्यायला, हस्तांदोलन करून शुभेच्छा द्यायला, अभिनंदन करायला भली मोठी रंग लागली. ती संपता संपत नव्हती. फोटो, व्हिडीओ शुटींग, कॅमेऱ्याचे फ्लश.. मी एखादी सेलिब्रेटी असल्याचा भास होत होता...
‘असे लग्न होणे नाही’ असं पुटपुटत जो तो आपापल्या घरी परतत होता...

Saturday 18 June 2011

शंकाच शंका...



आपल्या लग्नाचा करार झाला खरा पण तू कसा वागतोस याविषयी मनात शंका निर्माण झाली होती. तू लग्नाच्या पोषाखासाठी सात हजाराची मागणी केली होती. ती रक्कम तू लग्नापूर्वीच मागशील की नाही यावरून तुझ्या मनात काय आहे हे जोखता येणार होतं. ते पैसे घेऊन तू कशी कशी खरेदी करणार हे पाहून तुझा उधळेपणा किंवा कंजूषी समजणार होती. तू काय निर्णय घेतो यावर तुझा स्वभाव कळणार होता. तू व्यवहारात कसा आहेस ही शंका दूर होणार होती.
अचानक तुझी आई जेव्हा आमच्या घरी आली आणि बोलता बोलता म्हणून गेली की तू आता फारच काटकसर करू लागला आहे, परवा जुन्या बाजारातून दहा रुपयांच्या दोन अंडरवेअर खरेदी केल्या! मी तर हादरलेच ते ऐकून. काय हा चेंगटपणा, हा कसला व्यवहार? सात हजार कशाला घेतलेत मग? दहा बारा रुपयांच्या पँटी घ्यायला? छे! तू मुळीच व्यवहारी नाहीस किंवा तुला काय खरेदी करावं हेच कळत नाही किंवा तू घेतलेले पैसे वाचवू पाहतो आहेस. अशा अनेक शंकांनी मला घेरलं...
आपली निवड तर चुकली नाही ना? असंही वाटू लागलं. पण आता मागे वळण्याचे मार्ग खुंटले होते. जे असेल ते स्वीकारण्यावाचून गत्यंतर नव्हते. तू जर असा मुलखाचा चेंगट असशील तर माझ्या उधळ्या स्वभावाशी फारच मोठी तडजोड करावी लागणार असं दिसत होतं. तू कॉलेजला सायकलवर आठ किलोमीटर जायचास हे कळल्यापासूनच माझ्या मनात ही शंकेची पाल चुचुकत होती. तुझे आईवडील दोघेही शिक्षक असतांना आणि तू स्वतः डॉक्टर असतांना असं सायकलवर अपडाऊन करणं मला तरी पटलं नव्हतं. एखादी बाईक पिटाळत कॉलेज केलं पाहिजे इतका तू देखणा होतास. मग ही चिंगुशी का म्हणून?
आणि लग्नाच्या आदल्या दिवशी माझ्या मोठ्या भावानं खरी माहिती काढण्यासाठी तुझ्या खोलीत प्रव्वेश केला. लग्नाचे कपडे काय काय घेतले ते तुला दाखव म्हणाला. तू ब्लेझर दाखविले, जोधपुरी शिवलेला दाखविला, टाय, थ्रीपीस दाखविला. पण जेव्हा तू लग्नाचा जोडा त्याच्या हाती दिला व त्याने त्यातील फ्लाप उचकटून पाहिलं की ह तर चक्क जुना जोडा आहे. तो रागावून उठला ‘कळली तुमची खरेदी’ म्हणत तणतणत आला. त्यावेळी तर मी धाय मोकलून रडलेच बघ.
अरेरे! आपली शंका रास्त ठरत चाललीय. तू पक्का चेंगट आहेस हे आम्हां सर्वांना कळून चुकलं. तू जुन्या बाजारातून जुनाच  जोडा निम्म्या किमतीत आणला होतास तेव्हा ब्लेझर वगैरे वस्तू भाड्याने आणल्या नसतील कशावरून? अशा चर्चेला ऊत येऊन मी तर मनातून कोसळलेच. माझं तुझ्याशी खरेदी या विषयावर अजिबात जमणार नाही हे स्पष्ट झालं होतं. शॉपिंग हा विषय तर माझा जीव की प्राण असतांना तू इतका करंटा वागतोस हे कळल्याने मी खूपच नर्व्हस झाले होते. म्हणतात ना गरीब घरची पोर आणावी अन् आपली पोर श्रीमंत घरी द्यावी, याच्या अगदी उलट कारभार माझ्या बाबतीत घडत होता. तू फक्त नावाचाच डॉक्टर होतास, तुझायाकडे दीडदमडीही शिल्लक नव्हती हे दिसतच होतें. तुझी प्रॅक्टीस अशी तशीच चालत असणार हे उघड झालं होतं. फार फार तर महिन्याकाठी तुझा इनकम सात-आठ हजारांच्या आतच असणार हे मी ताडलं होतं. तू आणि तुझ्या दोन बहिणींचा घरखर्च भागवता भागवताच तुला नाकी नऊ येत असणार हे मला कळत होतं. पुण्यात रहायचं म्हणजे किमान वीस हजारांची कमाई हवी तरच महिना दोनचार हजार मागे पडू शकतात याचक अंदाज मी बांधू शकत होते. आणि खरेच जर तुझी आमदनी अगदी बोटावर मोजण्याइतकी क्षुल्लक असेल तर काय करायचं? ही चिंता मला स्वस्थ बसू देत नव्हती बघ. अशा तुटपुंज्या इनकम मध्ये तू कसे भागवत असशील याची कल्पना करूनच मला काटा फुटत होता. तुझा चेहरा जरी हंडसम असला तरी तुझा तो शंभराचा शर्ट, पन्नासाचा बूट, दीडशेची पँट आठवली की चीड यायची. तू जर असाच वागत राहिलास तर पुढे काय? माझी हौस मौज करशील की नाही? मला हवं ते पटकन देऊ शकशील की नाही? की मलाही अशी लंकेची पार्वती बनवून ठेवशील? अशा कितीतरी शंकांचं वादळ घोंगावत होतं.
चला आता वरून गाठी बांधल्याच आहेत तर निभावून न्यायच्या. अशा निराशावादी विचारानेच मी स्वतःला समजावीत राहिले. नशिबाला कोसत राहिले...

Sunday 12 June 2011

करार


करार...
तू माझ्याशी लग्न ठरवलंस, मग ह करार कशासाठी? म्हणजे मी कमावती असूनही तू हुंडा का मागावास? हे मला मुळीच पटलं नव्हतं. मी काही हेकणी नव्हते, चांगली देखणी होतेच की. का म्हणून तू व्यापार मांडलास? होय, मी तुलाच दोषी धरणार. कारण सर्व ठरवायला तूच होतास. तुला इतकंही कळू नये की आपली होणारी पत्नी सुशिक्षित आहे, पगारदार आहे, कमावती आहे. आपण कोणत्या तोंडाने येण्या-जाण्याचं भाडं, नवरदेवाचे कपडे, पाच तोळे सोनं, पंचवीस हजार वरदक्षिणा आणि लग्न करून देणे असाच करार केलास ना माझ्याशी? मी त्या रात्री पप्पांना किती ओरडले माहितीये का? म्हटलं, ‘तुम्ही तयारच का झाले इतकं सगळं द्यायला? मला काय दुसरी चांगली मुलं सांगून येत नव्हती का? या लालची लोकांपेक्षा कैक पटीनं मोठ्या मनाची मुलं भेटली असती. एवढा हुंडा द्यायला मी काय लुळीपांगळी आहे की आंधळी?’ आणि यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. निदान माझ्यापुढे तरी ते गप्प राहिले होते. जवळ जवळ पंधरा दिवस मी तुझ्यावर रुसून होते. मैत्रिणी समजावत, ‘जाऊ दे आर्या, आजकाल थोडंफार तरी देणंघेणं घेणं होतच असतं.’ मी उसळून म्हणे, ‘पण फक्त घेणंच का? देणं का नाही? त्यांनी आमच्याकडून फक्त घेतलं, असा करार केलाय. आणि मी हे विसरणार नाही. मी यातील पै अन् पै त्यांच्याकडून वसूल तर करणारच. शिवाय आयुष्यभर त्याला असा मुठीत ठेवीन ना की बस म्हटलं की बसलाच पाहिजे. नाही त्याला माझ्यापुढे हात पसरायला लावला तर नावाची आर्या नाही!’
माझी ती गर्जना ऐकून मैत्रिणी आता कसं होणार हिचं अशा मुद्रेने निरोप घेत. पण मी काही माघार घेतली नव्हती. ‘लग्न फक्त मलाच करायचं नाही, त्यांनाही करायचंच आहे की. मग सगळा भुर्दंड आम्हांला का? त्यांनी त्यांच्या खर्चानं यावं, त्यांचे कपडे त्यांनीच घ्यावेत, आम्ही पाच तोळे देणार तर त्यांनीही तितकेच सोने माझ्या अंगावर घालायला हवेत, वरदक्षिणा घेतली ना? मग वधुदक्षिणाही द्यावी. हा दुजाभाव का म्हणून?’ अशा मुद्देसूद चर्चेतून मी मला समजावू पाहणाऱ्यांना उलटं टांगत जायची! मला हे फक्त ‘देणं’ अजिबात पटलं नव्हतं. कधी एकदा तू तावडीत सापडतो अन् तुलाही चार शब्द सुनावतेय असं झालं होतं. आई मला शांत करायची- ‘अगं आर्या, काय तुझा वेडेपणा आहे हा? अगं तुझं चांगलं व्हावं म्हणून काहीही झालं तरी हे ठरत आलेलं लग्नं मोडायचं नाही असा विचार करूनच आम्ही त्यांच्या कडे सुपारी फोडायला गेला होतो. असा चांगला मुलगा, तोही डॉक्टर मिळाला असता का तुला? किती स्थळं येऊन गेलीत. काही विचार केला आहेस का तू? वय वाढल्यावर कोण पोरगा देईल?’ त्यवर मी चिडून बोलले- ‘तू गप्प बस हं मम्मी. मी काही एवढी म्हातारी झालेली नाहीये इतक्यात. अन् झाले तर झाले. मी माझ्या पायावर उभी आहे. मला चांगला दहा बारा हजार पगार मिळतो. पण मला एक कळत नाही, त्यांनी मागितले अन् तुम्ही लगेच द्यायला तयार झालात. का? काय आहे त्यांच्याकडं? गाडी? बंगला? नोकर चाकर? अगं ते एकदम भिकारी आहेत भिकारी. ना त्यांच्याकडे माझ्यासाठी एखादी सेपरेट खोली आहे, ना त्यांच्याकडे संडास बाथरूमची सोय आहे. आणि तरीही तुम्ही सगळ्या मागण्या कबुल करून आलात. छे! मला तुमचं हे वागणं पटलंच नाही. मी जर बैठकीत लग्न ठरवायला असते ना तर तिथल्या तिथे ठासून सांगितलं असतं, हुंडा घेणाऱ्याशी मी लग्न करणार नाही...’ माझ्या या जोरदार प्रतिकारानंतर तीही समजावून सांगणं सोडून देई.
परंतु मला ही गोष्ट स्वस्थपणे झोपू देत नसे. कधी वाटे- ‘आत्ताच नकार देऊन टाकावा. अशा मागतकरूंना जागीच नाही म्हणून केलेला करार तोडावा.’ नंतर विचार येई- ‘मग मम्मीपप्पांची किती नाचक्की होईल, ठरवलेलं लग्न मुलीनं नकार देऊन मोडलं, म्हणजे नक्कीच तिचं काहीतरी बाहेर कुठेतरी लफडं असणार, असा बभ्रा वाईट चिंतणारे लोक गावात पसरून देतील. काय करावं बरं?’ अशा चिंतेत रात्र सरत जाई...
तुझा नंतर फोन आला तरी मी फारशी बोलले नाही. ‘हो नाही’ इतकंच केलं. तुझ्यासारख्या स्वार्थी मुलाशी बोलण्याची इच्छाच नव्हती. मागाहून तुझं प्रेमळ पत्र आलं. त्यात ‘तू माझ्याशी बोलत का नाहीस?’ वगैरे प्रश्न होते. त्याचं पत्रोत्तर मात्र मी खरमरीत असंच दिलं. ‘माझ्या पप्पांकडून हुंडा घेतलातच का?’ असा सडेतोड प्रश्न त्यात होता. त्यावर तुझा मोठा मजेशीर जवाब आला- ‘अगं, सामाजिक प्रतिष्ठेसाठी हुंडा मागावाच लागतो. तुझ्या भावाच्या लग्नाच्या वेळी तुझे पप्पा देखील हुंडा घेतील की नाही बघ.’ परंतु माझं मात्र समाधान होत नव्हतं. फिरून मी तुला ऐकवी- ‘हुंडा न घेता सुद्धा तुम्हांला सामाजिक प्रतिष्ठा जपता आली असतीच की. आणि जर तुम्ही हुंडा मागितला नसता ना तर माझ्या पप्पांनी माझं सालंकृत कन्यादान केलं असतं, आहात कुठं? तुम्ही तो चान्स गमावलाय एवढं लक्षात घ्या. अहो मला नखशिखांत सोन्यानं मढवून तुमच्या घरी पाठवली असती त्यांनी. आता बसा पाच तोळेच मोजत. शंभर तोळ्याला तुम्ही मुकला आहात. आणि तुम्ही केलेला हा करार मी चांगलाच लक्षात ठेवणार आहे, समजलं? कवडी अन् कवडी वसूल केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. काय? आलं ना लक्षात?’
माझी ती धमकीवजा पत्रोत्तरं वाचून तुझी त्यावेळी कसली ओली अवस्था झाली असेल याची कल्पना करून मला माझ्याच मानी स्वभावाचं हसू येतंय आता!
त्यानंतर तू तुझ्या पत्रांतून प्रेमाच्या कवितांचा रतीबच घातलास आणि मी माझा ‘पण’ काही काळ विसरले. तुझ्या मोहक शब्दांत अडकले. मला माझ्या शपथेचा विसर पडत गेला. ‘चालायचेच, समाजाच्या माहितीसाठी घेतला असेल हुंडा.’ अशी समजूत घालून मी ती बाब स्वीकारली. तो करार मी मान्य केला अन् तुझ्या भेटीची आस घेऊन झोपी जाऊ लागले...

Thursday 9 June 2011

अनामिक भीती

अनामिक भीती
तुझं प्रति टपाली आलेलं उत्तर वाचून मला अनामिक भीतीनं घेरलं. माझ्या इतर मैत्रिणींची लग्नं झाली होती. त्यांनी काहीबाही सांगून मला भेडसावून सोडलं होतं. मी भलतीच घाबरले. ही गोष्ट कुणाला सांगावी? या विवंचनेत असतांना तू आमच्या घरी आलास. निमित्त होते, लग्न पत्रिका चापून आणल्याचं. खरे तर मीच तुला बोलावून घेतलं होतं. ही गोष्ट फोनवर बोलता येणार नाही. प्रत्यक्ष भेटूनच सांगीन असे म्हटल्यावर तू लागलीच आलास. माझ्या जीवात जीव आला खरा, पण कोणत्या शब्दांत सांगावं याची चिंता वाटू लागली. नंतर मनाचा निर्धार केला. म्हटलं ह तर आपला होणारा जीवनसाथी, याच्याशी ही भीती शेअर नाही करायची तर कुणाशी? मैत्रिणींनी तर आपल्याला आधीच काहीबाही सांगून ठेवलंय. खरंच असं होतं का? हेच तुला विचारायचं होतं. मी तर कसं विचारावं या विचारानेच बावरून गेले होते बघ.
आणि त्या सायंकाळी मी तुला गावापासून लांबवर असलेल्या शिवमंदिरात नेलं. ती जागा खुच शांत होती. तिथे चिटपाखरूही नव्हतं. त्या एकांताला मीच घाबरू लागले. दाट किर्र झाडी, पक्ष्यांचे मिश्र आवाज, आपण दोघे सोडले तर कुणीही नाही. उगाच इकडे आलो असं वाटू लागलं.
पण तू म्हणालास, ‘ अगं वेडी का खुळी? कशाला घाबरतेस या निवांत निसर्गाला? ही सृष्टी बघ किती आनंदी आहे, या रम्य संध्याकाळची मौज लुटते आहे.. पानं सळसळताहेत, पक्षी मधुर कूजन करताहेत, त्यांच्या पिलांच्या भेटीचा हा दिलचस्प सोहळा फांदीफांदीवर घडतो आहे. अन् तू घाबरतेस. अगं मी आहे ना. तू एकटी का आहेस?’
तुझी ती आश्वासक वचने मनात साठवून मी पटकन तुला बिलगले! कितीतरी आधार वाटला त्यावेळी. शब्दांत सांगता येणं कठीणच. तूही मला कवेत घेऊन माझ्या पाठीवरून विश्वासक हात फिरवला अन् मला किती बरं वाटलं म्हणून सांगू?वाटलं याचसाठी लग्न करायचं असतं ना? एकमेकांना समजावून घेत, आधार देत हा सहजीवनाचा मार्ग दोघांनी एकरूप होऊन चालायचा असतो नाही का? जरा वेळ असाच त्या प्रेमळ भाव समाधीत गेला आणि अचानक तू विचारलंस, ‘काय गं आर्या, तू काय सांगणार होतीस महत्त्वाचं?’ मला तेव्हा कुठे माझ्या अनामिक भीतीची आठवण झाली. तुझ्याशी असं मिठीत एकरूप झालेले असतांना ती भीती कुठे गेली होती? जी की याचा एकरूप होण्याशी संबंधित होती. पण ती भीती आता मौका आली तर सांगूच टाकू एकदाची. म्हणजे मनावरचं मणामणाचं ओझं कमी तरी होऊन जाईल.
काहीवेळ मी बोललीच नाही. कशी सुरुवात करावी हेंच कळत नव्हते. तू पुन्हा विचारलेस, ‘ अगं सांगतेस ना? कसली काळजी वाटतेय तुला?’ त्याच्या खांद्यावर माथा टेकवून मी दीर्घ श्वास घेतला अन् सांगून टाकलं, ‘मला खूप भीती वाटतेय रे.’
‘कशाची?’
‘अं अं आपल्या पाहिल्या कॉन्टॅक्टची...’ मी हुश्श केलं. सांगितलं एकदाचं. मी निश्चिंत झाले व त्याच्या उत्तराची वाट पाहू लागले. तो स्वतः डॉक्टर असल्याने काय प्रतिसाद देतो ते जाणून घ्यायचं होतं.
‘वेडी गं वेडी. अगं हा सर्व नैसर्गिक भाग असतो. निसर्गातील हर एक कळी उमलते की नाही? मृदेला अलगद दूर करून बी अंकुरतेच की नाही? पावसाचा प्रत्येक थेंब मृदेत हळुवार विसावतोच की नाही? मग यातील कुणी रडतं का? की ते नवं होणं कुणी टाळतं का? मग तू कशाला एवढं मनाला लावून घेतेयेस ती गोष्ट?’
‘तरी पण भीती वाटतेच, खूप त्रास होतो म्हणतात. रक्त...’
‘छे छे! असलं काही चिंतू नकोस. तुला काहीएक त्रास होणार नाही याची काळजी घेईन मी. आणि तीच क्रिया महत्त्वाची आहे का? ते आपोआप मागाहून घडेलच. आधीच पाण्याला घाबरल्यावर पोहता येईलच कसे? कळतंय का?’
तुझ्या त्या संधिग्ध उत्तरानं मी आणखीनच बुचकळ्यात पडले. काही होणार नाही असे तू म्हणालास. काळजी घेईन हेही सांगितलंस. पण मला मात्र भयानक भीती लागून राहिली. तुला नकार देता येईल का? ती क्रिया कशी टाळता येईल? की तू म्हणतो तसं आपोआप उमलणं घडत जाईल का? काही काही उत्तर मिळत नव्हतं...
माझी अनामिक भीती तू देखील ‘तत्पूर्वी’ घालवू शकला नव्हतास!

Saturday 4 June 2011

पत्रोत्तरे...

तुला आठवत असेलच, आपले लग्न व्हायला बराच अवधी होता. साधारणतः चार महिने. त्यामुळे आपला कितीतरी पत्रव्यवहार चालायचा, हो की नाही? मी तर तुझे पत्र हाती पडले की लगेच फोडायची, एकांतात कितीदा तरी पुनर्वाचन करीत जायची. कारण ते पत्र नसायचंच मुळी, तुझ्या उत्कट प्रेमभावनांचा शाब्दिक कल्लोळ असायचा. तू माझ्यासाठी कितीतरी कविता केल्या होत्यास. मला मात्र एकही जमली नाही. मी आपली दोन चार ओळी खरडल्या की बस्स करायची. मला तुझ्या इतकं लिहिणं कधी जमलंच नाही रे. तू मात्र भरभरून लिहायचास. तुला हे सुचतं तरी कसं? हे कोडं मला पडायचं. माझा अन् लिखाणाचा पहिल्यापासून छत्तीसचा आकडा होता. तरी तुझ्या पत्रांना उत्तर देणं भाग असल्याने मी रोज थोडं थोडं लिहीत जायची. तोपर्यंत तुझं दुसरं पत्र आलेलं असायचं!
ही पत्रापत्री म्हणजे एकतर्फी संवादच असायचा. म्हणजे असं की, मी काही प्रश्न विचारायचे तर तुझ्याकडे त्याची उत्तरं नसायची. मग तू इकडून तिकडे विषयांतर करून पत्र संपवायचा. किंवा तू उपस्थित केलेल्या प्रश्नांना मी जवाब देण्यात दिरंगाई करायची. त्यात तुझं आणखी एखादं पत्र आलं की पहिल्याचं पत्रोत्तर देणं अर्ध्यावरच राही. तुझं पत्रं मात्र एखादं पुडकंच असायचं बघ. दहा बारा पानांचं पत्र मी मन लावून वाचायची. त्यात गुरफटून जायची...
मला आठवतं, सासरी गेल्यावर माझं नांव ‘म’ अक्षराने ठेवावं असं एका ज्योतिषानं सांगितल्याचं मी तुला कळवल्यावर तू तब्बल चाळीस नावे शोधून काढली. नव्हे त्यांची अशी बेमालूम कविता बनवली की मला आश्चर्यच वाटले. वानगीदाखल पुनरुच्चार करते-
‘सांग तुला काय म्हणू? मंगल, मृदुला, मंगला?
मंदा, मधुरा, माधवी? मनीषा म्हणू की मेखला?
माया म्हणू की मयुरी? माला म्हणू की मध्यमा?
मुक्ता, मीना, मीनाक्षी? मीरा म्हणू की महिमा?’
आणि यातील एकाही नावाने तू मला संबोधले नाहीस, माझ्या घरचे मला आर्या म्हणतात म्हणून तूही तेच नाव स्विकारलंस. 'मी वेगळ्या नावाने हाक मारल्यावर तुला ऑकवर्ड वाटू नये म्हणून जवळच्या व्यक्तिसारखं आर्याच म्हणणार मी.' असं तुझं थिंकींग होतं!
माझ्या दिनचर्येची कविता देखील अशीच चपखल होती बघ. मी शाळेला जाते, काय करते, परतल्यावर काय करीत असेन, हे तू फार मोजक्या शब्दांत ताडलं होतंस. या गोष्टी मी कधी तुझ्याकडे बोलले नसतांनाही तू कशा काय जाणल्यास? त्यामागे तुझी कल्पनाशक्ती दडली होती तर!
‘रोज रात्री माझी पत्र वाचशील तन्मयतेनं,
शब्दागणिक माझ्या खुलशील आत्मीयतेनं.
नेहमीसारखं सकाळी रमत गमत उठशील,
घाई गडबड करीत ‘सनी’वरून निघशील.
अsय आर्या हळूच बरं, रस्त्यात खड्डे असतात,
माणसं येऊन धड्कणारी पूर्ण शुद्धीत नसतात!
शाळेत पोचल्यानंतर तू प्रातःप्रार्थना घेशील,
खडूने फळ्यावरती मग गृहपाठ लिहिशील.
मुलांच्या गोंगाटातही मला याद करशील,
आपण कुठे आहोत क्षणभर विसरशील.
दुपारी जेवतांना मात्र एक घास माझा असेल,
सर्वाधिक गोडवा आर्या, त्यातच तुला भासेल!
संपवून सायंप्रार्थना सुखरूप घरी येशील,
चहापाणी घेऊन मग ध्यानधारणा करशील.
रात्री जेवणानंतर तू फोनची वाट पाहशील
आला फोन माझा तर अखंड बोलत राहशील.
फोन नाही केला म्हणून कधी मजवरी रुसशील,
मात्र पुन्हा पत्रांमध्ये झोप येईतो रमशील.
तुझ्या निवांत झोपेमध्ये गोड स्वप्न पडेल तुला..
त्या स्वप्नात अsय आर्या, फक्त मीच भेटेन तुला!
फक्त मीच भेटेन तुला!’
ही कविता मी माझ्या मैत्रिणींना कितीदातरी दाखवली असेल. त्यांच्या नजराच सांगायच्या, 'खूप लकी आहेस गं आर्या तू!'
आणि लग्नाची तारीख जवळ आल्यावर ‘लग्नानंतर फिरायला कोठे जायचं?’ यावरही आपली पत्रातून चर्चा झाली. मी लिहिलं होतं, ‘मला सागरकिनारा खूप आवडतो. ती लाटांची मंजुळ गाज, तो निळाशार पाणपसारा, तेथील रोमॅन्टीक माहोल मला तुझायासोबत अनुभवायचा आहे, म्हणूनच मी हनिमूनसाठी कोकणात जावं असं म्हणत्येय...’ यावर तू नक्कीच हसला असशील. मनात म्हणाला असशील- ‘वेडी गं बाई, वेडीच आहेस. उन्हाळ्यात कुठे समुद्राकाठी तेही हनिमूनला जातात का? ते उष्ण खारेवारे, दमट हवा, वाळलेली राने वने पाहण्यात कुठून आला रोमान्स?’ मला हे फार उशिरा कळलं. जेव्हा तू भलं मोठं पत्रोत्तर दिलंस- ‘अगं उन्हात जाऊन समुद्रातवरच खार खाऊन येण्यापेक्षा थंड हवेच्या ठिकाणी जाऊ यात की. मी माथेरानचा स्पॉट निवडलाय. कसा वाटला? जवळही आहे अन् थंड हवा असल्याने अधिक मजा येईल. हो ना?’ तुझं ते संयुक्तिक विचार करणं मला पटलं. मी मधुचंद्राची स्वप्ने रंगवू लागले..
आणि त्या मिलनातूर भावनेच्या भरातच मी पत्रोत्तर दिलं- ‘तुला तारखा निवडणं सोईस्कर व्हावं म्हणून सांगतेय.. मला हे फोनवर सांगण्यास संकोच वाटतो. आपलं लग्न एकोणाविसला होईल. त्यानंतर तीनचार दिवसांनी म्हणजे तेवीस किंवा चोविसला माझी डेट येत असते. आता हे तुला सांगणं गरजेचं आहे. तेव्हा हनिमूनचं प्लॅनिंग तू निश्चित करून टाक.’
पाठोपाठ लगेच तुझं पत्रोत्तर आलं- ‘सहव्वीस ते तीस असं माथेरानमधील ब्राईटलँड हॉटेलचं वूडन कॉटेज बुक केलंय...’

Friday 27 May 2011

पहिलीच भेट झाली..

मनात येणारं मळभ त्यागून मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार झाले. सुपारी फुटली आणि एका वेगळ्याच विश्वात पाऊल टाकल्याचे जाणवू लागले. तू आमच्या घरी फोन करायचास, पप्पाच उचलायचे. कधी कधी इकडचं तिकडचं खूप बोलून तुला ताटकळत ठेवायचे. मग शेवटी मला हाक मारुन माझ्याकडे रिसिव्हर सोपवायचे. एव्हाना तुझा गप्पांचा मूड गेलेला जाणवायचा. 'जेवण झालं का? काय खाल्लं?' असं फारच जुजबी बोलणं व्हायचं अन् तुझ्यामागे एसटीडीबूथ वर फोन करणारांची रांग 'बस्स झालं, ठेवा आता, किती बोलताय?' असं चेकाळू लागलेली मलाही ऐकू येऊ लागल्यावर लिँक तुटायची, हिरमोड व्हायचा.
आणि एके दिवशी तू आमच्या घरी आलास. काय बोलू, किती बोलू, किती किती पाहू, किती किती न्याहाळू असं होऊन गेलं होतं. एकांत नव्हता तरीही डोळे तुझ्याच नेत्रांचा ठाव शोधीत होते..
मी अबोली रंगाची छानशी साडी नेसलेली. साडीत मी फारच सुंदर दिसते, असं मैत्रिणी म्हणायच्या. जेवणं झाल्यावर आपण प्रथमच शेजारी शेजारी बसून फोटो काढून घेतले. आपला तो जोडा इतका छान दिसत होता ना, की बस्स! मी तर तुला प्राप्त करुन हरखूनच गेले होते बघ.
मग संध्याकाळी पप्पांची परवानगी घेऊन पिँट्याच्या हिरोहोंडा मोटरसायकलवर मला फिरायला नेण्याचा हट्ट तुजपाशी केला. त्याला हट्ट म्हणताच येणार नाही, कारण तुलाही तेच हवं होतं की काय, तू एकाच हाकेत तयार झालास. मी कपडे चेंज करुन ड्रेस परिधान केला व रेडी झाले.
आपण नदीकाठच्या रम्य घाटावर जायचे ठरवले. तसा तू आमच्या गावी एक वर्ष कॉलेजसाठी राहिला होतास. हे गाव तुला नवं नव्हतं, रस्तेही ठाऊक होते. प्रश्न होता तो गाडीचा. तू पुण्यात बजाज फोर एस चालवायचास अन् ही पिँट्याची हिरोहोँडा होती. हिचे गिअर मागे टाकावे लागतात हे तुला माहीत असावे बहुतेक, परंतु प्रत्येक गिअरवर तुझी फसगत होत होती. पुढे टाकू की मागे अशा द्वंद्वात गिअर चुकायचा अन् गाडी गचकन् आचका द्यायची, त्यासरशी मी तुझ्यावर मागून आदळायची! तुला तो स्पर्श मोहक जाणवायचा तर मला तुझा तो आगाऊपणा वाटायचा. मी ओरडलेही, 'अरे हळू हळू!' आणि पटकन जीभ चावली. मी तुला चक्क एकेरी संबोधत होते. पण तुला त्याचं काहीच वाटलं नाही, 'असू दे चालेल मला, फक्त चारचौघांत अरे तुरे करु नकोस.' तू अशी सोपी अट घातल्यावर मला स्वर्गही ठेंगणा वाटू लागला. कारण आपल्या एकांतात मी तुला 'अरे ऐकलंस का?' म्हणत शब्दशः अधिक जवळ येऊ शकणार होते!
नदीप्रवाहाचा मंजुळ नाद अन पाखरांची किलबिल वातावरण चैतन्यमयी करीत होती. संधिकालचा मंद प्रकाश आल्हाददायी होता. एकूणच रोमँटीक घडी होती.. घाटावर आपण दोघेच!
मी तुझ्या खांद्याची उशी करुन ते प्रेमील क्षण अंतरात साठवून ठेवित होते. त्या मंत्रमुग्ध संध्या समयी आपलं काय बोलणं झालं, मी तुला कोणते प्रश्न विचारले, तू काय उत्तरं दिलीस? यातील काही म्हणजे काहीच आठवत नाही बघ! तुलाच कदाचित स्मरत असेल कारण त्या प्रथमीच्या भेटीनंतर पाठविलेल्या लांबलचक पत्रात तू लिहिलं होतंस-
'बहाणा तूही केलास
मुंगी हटविण्याचा?
की माझ्या गालांवर
अधिकार सांगण्याचा,
की बहाणा तुझाच होता
हळुवार स्पर्शण्याचा!'
तुझी ती तरल कविता मी कितीदातरी वाचत राहिले. तुझ्या गालांवर चढलेली मुंगी मी झटकली असेलही, परंतु त्या कृतीला इतकं प्रेमळपणे शब्दबद्ध करणं मला जमलंच नसतं. तुझ्यातल्या कवित्वाचा हा अनोखा पैलू समोर आल्याने मी आणखीनच भावविभोर झाली होते.. तुझ्या आणखी निकट येत होते...

Wednesday 25 May 2011

प्रश्नच प्रश्न

तुझं माझं लग्न ठरण्याआधी कितीतरी प्रश्न माझ्यापुढे उभे ठाकायचे...
तू इथेच शहरात राहशील का? की सेटल्ड प्रक्टीस मोडून तुझ्या त्या भुक्कड गावात एकं दोनं करायला जाशील? मला तर तुझं ते अडनीड गावठाण ऐकूनच माहिती झालं होतं. त्या गावाचा महिमा बराच ऐकला होता. भामट्यांचं गाव आणि चोरांची वाडी असलेल्या त्या गावात पाण्यासाठी बोंबाबोंब चालते तर गल्लोगल्ली हागणदारीचा गंध दरवळत असतो. जिथे तिथे दारुभट्ट्यांचा उग्र वास आणि रसायनाचे मळीसारखे पाट वाहत वाहत सुकलेले दिसतात. व्यसनी दारुड्या गंजडी चोरांच्या अशा रोगी गावात मी राहणार कशी? तुझा मात्र एकच घोषा होता 'मी गावीच परतणार.' तुला समजवावं कसं? हा प्रश्न मला सतवायचा. तेव्हा मम्मी मला समजावयाची, 'अगं एकदा लग्न होऊन जाऊ दे तर खरं, मग तुला सांगते त्याचं मन कसं वळवायचं ते. पुरुषांना पटवायची युक्ती फार काही अवघड नसते.'
त्यातही पप्पांनी तुझ्या गावाकडच्या घराचं केलेलं वर्णन ऐकून तर माझा हिरमोडच झाला. तुझ्या त्या गळक्या पत्र्यांच्या एकेरी घरात मी कसा काय संसार करायचा? या प्रश्नाने मला नको नको केलं होतं. तुझ्या घरात ना बाथरुमची सोय होती ना संडासची. उघड्या न्हाणीत मी न्हाणार कशी? झाडा झुडपाआड, लपत छपत, लोटाभर पाण्यात प्रातःकालचा कार्यभाग उरकणं मला जमेलच कसं? हे प्रश्नसुद्धा मला भंडावून सोडायचे.
त्यात तुला एकूण तीन बहिणी! म्हणजे त्या तिघी व एक सासू अशा चार सासवांच्या सासूरवासापुढे मी एकटी कितपत तग धरू शकेल? दोन नणंदांची लग्न झालेली असली तरी त्या माहेरी आल्यावर त्यांच्या पोराबाळांची, पाहुण्यांची सरबराई माझ्याच्याने होईल का? त्या चौघीँचा जाच माझ्यासारख्या मानी स्वभावाच्या नोकरदार शिक्षिकेला सहन करता येईल का? अशा कितीतरी कारणांमुळे मी तुझ्या गावाकडे जाण्याच्या निर्णयाने प्रश्नांकित झाले होते.
त्यात तू एक डॉक्टर, मेडिकल फिल्डचा देखणा तरुण. तुला नक्की किती गर्लफ्रेन्ड होत्या किँवा असतील? मेडिकल कॉलेजची पोरंपोरी कशी वागतात हे मी जाणून होतेच. त्यामुळे हा शंकेखोर प्रश्नही मला चिँतातूर करायचा. डॉक्टरांवरील अनेक कथा कादंबऱ्‍या मी वाचलेल्या होत्या. काही आत्मचरित्रेही वाचलेली. त्यात वर्णन केल्याप्रमाणे तू काम केलेल्या हॉस्पिटलमधील नर्सेस, सिस्टर्स किंवा दायांशी रात्री अपरात्रीचे प्रसंग तुझ्याबाबत घडले असतील का? त्यातील एखाद्या तरुण नर्सच्या अंगाशी तू लगट केले असशील का? किँवा पूर्ण भूल दिलेल्या बेशुद्धावस्थेतील एखाद्या देखण्या युवतीवर तू...?
छे! छे! असं काहीच घडलेलं नसेल तर फार चांगलंच आहे. अशाप्रकारे स्वतःलाच समजावित मी निजण्याचा प्रयत्न करायची. कारण या प्रश्नांचं भेंडोळं मला सोडवताच येत नसे. एक प्रश्न उभा ठाकला की अनेक उपप्रश्नांचा गुंता निर्माण होई. हे 'पण परंतु किँतु'चे प्रश्न विचारावेत तरी कोणाला? हाही एक मोठ्ठा प्रश्नच होता. आणि तरीही मी सर्व प्रश्नांना शिरोधार्य मानून विवाहाचा हा आंधळा जुगार खेळण्यास तयार झालेच कशी? हा एक यक्षप्रश्न मला पडायचा, याला मात्र एकच उत्तर यायचं- तू मला मनापासून आवडला होतास!