Saturday 4 June 2011

पत्रोत्तरे...

तुला आठवत असेलच, आपले लग्न व्हायला बराच अवधी होता. साधारणतः चार महिने. त्यामुळे आपला कितीतरी पत्रव्यवहार चालायचा, हो की नाही? मी तर तुझे पत्र हाती पडले की लगेच फोडायची, एकांतात कितीदा तरी पुनर्वाचन करीत जायची. कारण ते पत्र नसायचंच मुळी, तुझ्या उत्कट प्रेमभावनांचा शाब्दिक कल्लोळ असायचा. तू माझ्यासाठी कितीतरी कविता केल्या होत्यास. मला मात्र एकही जमली नाही. मी आपली दोन चार ओळी खरडल्या की बस्स करायची. मला तुझ्या इतकं लिहिणं कधी जमलंच नाही रे. तू मात्र भरभरून लिहायचास. तुला हे सुचतं तरी कसं? हे कोडं मला पडायचं. माझा अन् लिखाणाचा पहिल्यापासून छत्तीसचा आकडा होता. तरी तुझ्या पत्रांना उत्तर देणं भाग असल्याने मी रोज थोडं थोडं लिहीत जायची. तोपर्यंत तुझं दुसरं पत्र आलेलं असायचं!
ही पत्रापत्री म्हणजे एकतर्फी संवादच असायचा. म्हणजे असं की, मी काही प्रश्न विचारायचे तर तुझ्याकडे त्याची उत्तरं नसायची. मग तू इकडून तिकडे विषयांतर करून पत्र संपवायचा. किंवा तू उपस्थित केलेल्या प्रश्नांना मी जवाब देण्यात दिरंगाई करायची. त्यात तुझं आणखी एखादं पत्र आलं की पहिल्याचं पत्रोत्तर देणं अर्ध्यावरच राही. तुझं पत्रं मात्र एखादं पुडकंच असायचं बघ. दहा बारा पानांचं पत्र मी मन लावून वाचायची. त्यात गुरफटून जायची...
मला आठवतं, सासरी गेल्यावर माझं नांव ‘म’ अक्षराने ठेवावं असं एका ज्योतिषानं सांगितल्याचं मी तुला कळवल्यावर तू तब्बल चाळीस नावे शोधून काढली. नव्हे त्यांची अशी बेमालूम कविता बनवली की मला आश्चर्यच वाटले. वानगीदाखल पुनरुच्चार करते-
‘सांग तुला काय म्हणू? मंगल, मृदुला, मंगला?
मंदा, मधुरा, माधवी? मनीषा म्हणू की मेखला?
माया म्हणू की मयुरी? माला म्हणू की मध्यमा?
मुक्ता, मीना, मीनाक्षी? मीरा म्हणू की महिमा?’
आणि यातील एकाही नावाने तू मला संबोधले नाहीस, माझ्या घरचे मला आर्या म्हणतात म्हणून तूही तेच नाव स्विकारलंस. 'मी वेगळ्या नावाने हाक मारल्यावर तुला ऑकवर्ड वाटू नये म्हणून जवळच्या व्यक्तिसारखं आर्याच म्हणणार मी.' असं तुझं थिंकींग होतं!
माझ्या दिनचर्येची कविता देखील अशीच चपखल होती बघ. मी शाळेला जाते, काय करते, परतल्यावर काय करीत असेन, हे तू फार मोजक्या शब्दांत ताडलं होतंस. या गोष्टी मी कधी तुझ्याकडे बोलले नसतांनाही तू कशा काय जाणल्यास? त्यामागे तुझी कल्पनाशक्ती दडली होती तर!
‘रोज रात्री माझी पत्र वाचशील तन्मयतेनं,
शब्दागणिक माझ्या खुलशील आत्मीयतेनं.
नेहमीसारखं सकाळी रमत गमत उठशील,
घाई गडबड करीत ‘सनी’वरून निघशील.
अsय आर्या हळूच बरं, रस्त्यात खड्डे असतात,
माणसं येऊन धड्कणारी पूर्ण शुद्धीत नसतात!
शाळेत पोचल्यानंतर तू प्रातःप्रार्थना घेशील,
खडूने फळ्यावरती मग गृहपाठ लिहिशील.
मुलांच्या गोंगाटातही मला याद करशील,
आपण कुठे आहोत क्षणभर विसरशील.
दुपारी जेवतांना मात्र एक घास माझा असेल,
सर्वाधिक गोडवा आर्या, त्यातच तुला भासेल!
संपवून सायंप्रार्थना सुखरूप घरी येशील,
चहापाणी घेऊन मग ध्यानधारणा करशील.
रात्री जेवणानंतर तू फोनची वाट पाहशील
आला फोन माझा तर अखंड बोलत राहशील.
फोन नाही केला म्हणून कधी मजवरी रुसशील,
मात्र पुन्हा पत्रांमध्ये झोप येईतो रमशील.
तुझ्या निवांत झोपेमध्ये गोड स्वप्न पडेल तुला..
त्या स्वप्नात अsय आर्या, फक्त मीच भेटेन तुला!
फक्त मीच भेटेन तुला!’
ही कविता मी माझ्या मैत्रिणींना कितीदातरी दाखवली असेल. त्यांच्या नजराच सांगायच्या, 'खूप लकी आहेस गं आर्या तू!'
आणि लग्नाची तारीख जवळ आल्यावर ‘लग्नानंतर फिरायला कोठे जायचं?’ यावरही आपली पत्रातून चर्चा झाली. मी लिहिलं होतं, ‘मला सागरकिनारा खूप आवडतो. ती लाटांची मंजुळ गाज, तो निळाशार पाणपसारा, तेथील रोमॅन्टीक माहोल मला तुझायासोबत अनुभवायचा आहे, म्हणूनच मी हनिमूनसाठी कोकणात जावं असं म्हणत्येय...’ यावर तू नक्कीच हसला असशील. मनात म्हणाला असशील- ‘वेडी गं बाई, वेडीच आहेस. उन्हाळ्यात कुठे समुद्राकाठी तेही हनिमूनला जातात का? ते उष्ण खारेवारे, दमट हवा, वाळलेली राने वने पाहण्यात कुठून आला रोमान्स?’ मला हे फार उशिरा कळलं. जेव्हा तू भलं मोठं पत्रोत्तर दिलंस- ‘अगं उन्हात जाऊन समुद्रातवरच खार खाऊन येण्यापेक्षा थंड हवेच्या ठिकाणी जाऊ यात की. मी माथेरानचा स्पॉट निवडलाय. कसा वाटला? जवळही आहे अन् थंड हवा असल्याने अधिक मजा येईल. हो ना?’ तुझं ते संयुक्तिक विचार करणं मला पटलं. मी मधुचंद्राची स्वप्ने रंगवू लागले..
आणि त्या मिलनातूर भावनेच्या भरातच मी पत्रोत्तर दिलं- ‘तुला तारखा निवडणं सोईस्कर व्हावं म्हणून सांगतेय.. मला हे फोनवर सांगण्यास संकोच वाटतो. आपलं लग्न एकोणाविसला होईल. त्यानंतर तीनचार दिवसांनी म्हणजे तेवीस किंवा चोविसला माझी डेट येत असते. आता हे तुला सांगणं गरजेचं आहे. तेव्हा हनिमूनचं प्लॅनिंग तू निश्चित करून टाक.’
पाठोपाठ लगेच तुझं पत्रोत्तर आलं- ‘सहव्वीस ते तीस असं माथेरानमधील ब्राईटलँड हॉटेलचं वूडन कॉटेज बुक केलंय...’

No comments:

Post a Comment