Saturday 25 June 2011

लग्नाचा डामडौल..

तुझं माझं लग्न किती डामडौलात झालं हे का मी सांगायला पाहिजे. डॉक्टर जावई मिळाला म्हणून पप्पा भलतेच खूष होते. ते शिकले नाहीत परंतु आम्हां पोरांना त्यांनी शिकवलं. मी डी.एड. झाले अन् लगेच झेडपीत नोकरीला लागले. त्यात मला काही मुले पसंत पडत नव्हती. मास्तर पोरगा मला करायचा नव्हता. डॉक्टर किंवा इंजिनिअर मिळाला तर बहार येईल, असं मनोमन वाटत होतं. मुलं पाहण्यात वगैरे दोन वर्षे भुर्रकन निघून गेली. त्यानंतर मला लग्नच नको असं नैराश्य येऊ लागलं. मम्मी पप्पा चिंतेत होते. इतक्यात तू मला पाहून गेलास, पसंती कळविलीस, आणि सुपारीही फुटली. मग काय आमच्या घरातली लगीनघाई सांगू?
त्या दोन तीन महिन्यात पप्पांनी अक्षरशः पाण्यासारखा पैसा ओतला. घरात पाहिलंच लग्न, झोकात झालं पाहिजे, समाजात पत निर्माण झाली पाहिजे, लोकांनी तोंडात बोटे घालायला हवीत, पाहुणे तर हवेतच उडायला पाहिजेत अशी अनेक करणे त्यामागे होती. आणि तयारीही तशी सुरु झाली. दररोज रात्री बैठका होऊ लागल्या, नियोजने आखली जाऊ लागली, कितीतरी लोकांचा, पोरांचा राबता वाढला, घरगडी येऊ जाऊ लागले. बरीच कामे जाणकारांवर सोपवून पप्पा निश्चिंत मनाने पुढील व्यवस्था पाहू लागले.
आमचं होलसेल तसेच किरकोळ किरण मालाचे दुकान असल्याने गिऱ्हाईके अमाप लाभली होती. त्यातील बरीचशी ओळखीची आणि घष्टनीतली बनली होती. त्याचा फायदा आत्ता होत होता. लग्न म्हटल्यावर वधुपित्याला काय काय समस्यांना तोंड द्यावे लागते हे मी जाणून होते. परंतु पप्पांना काही पहावे लागले नाही. त्यांनी फक्त कामे वाटून दिली आणि ती मनाजोगी होत गेली...
आपलं लग्न अगदी राजेशाही थाटात होईल असं मलातरी कधीच वाटलं नव्हतं. परंतु पप्पांनी भलतंच मनावर घेत हे पहिलंच लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिलं. त्याचं वर्णन करण्याचा मोह आजही मला आवरता येत नाही बघ.
लग्नाच्या आठ दिवस अगोदरच गल्लीतल्या झाडून साऱ्या महिलांना बांगड्या भरण्याचा जाहीर कार्यक्रम झाला. तब्बल दहा हजार रुपयांच्या बांगड्या कुणी भरल्या असतील? चार दिवस आधीपासूनच जेवणावळी सुरु केल्या होत्या. एक मोठ्ठा हॉलच त्यासाठी बुक करून ठेवला होता. आज या बाजूचे लोक, उद्या त्या बाजूचे, परवा पलीकडचे असे चारही दिशांनी आमची गिऱ्हाईके विखुरलेली असल्याने दररोज किमान दोन हजार व्यक्तींच्या पंगती उठत होत्या. त्यामुळे अखेरपर्यंत मनुष्यबळ कमी पडलंच नाही. पप्पांचा वट जबरदस्त वाढला. कालपरवा पर्यंत क्षुल्लक किराणा दुकानदार समजले जात असलेले पप्पा एकदम प्रथितयश व्यापारी या गिणतीस पात्र झाले, इतकेच नाही तर त्यांच्या नावापुढे शेठ ही पदवी आपोआप लोकांच्या तोंडी येऊ लागली.
लग्नाच्या आदल्या रात्री तू आमच्या गावी आलास तर तुमचं स्वागत करायलाच पाचशे लोक अन् नातेवाईक उभे ठाकले होते यावरूनच पप्पांच्या दबदब्याची कल्पना यावी. लग्नाच्या दिवशी सकाळपासूनच गर्दी व्हायला लागली. लग्नासाठी प्रशस्त रंगमंदिर बुक करावं लागलं होतं. किमान पंधरा हजार लोक येतील अशी अपेक्षा होती. त्यामुळे मोठ्यात मोठं स्टेज असलेलं रंगमंदिर लग्नाच्या भव्यतेला शोभून दिसणार होतं.
सकाळी नऊ वाजता हळद लागली...
शे दोनशे बायकांनी मला हळदीची उटी लावून लावून पार माखून टाकली. तुझीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. तू तर पिवळाजर्द होऊन गेला होतास. इतक्या हातांनी हळद चोपडल्याने गालांवर हळदीची थप्पी जमा झाली होती. त्यानंतर आपल्याला साग्रसंगीत अंघोळ घालण्यात आली, तेथेही तेच. कितीतरी बायका व मुली मी मी म्हणत तांब्याभर पाणी आपल्यावर ओतण्यासाठी धडपडत होत्या. दहा वीस बादल्यांनी मी तर पहिल्यांदाच अंघोळ करीत होते. एक वेगळाच अनुभव येत होता...
त्यांनतर साखरपुडा झाला. त्यासाठीही जय्यत तयारी केली गेली होती. प्रत्येकाला नाश्ता म्हणून पोहे, सामोसे, वडापाव, उप्पीट काय लागेल ते हजर होते. पाहुणे मंडळी जाम खूष असल्याचे त्यांचे डोळेच सांगत होते. तू तर ह लग्नाचा डामडौल पाहून अचंबितच झालेला दिसत होता. साखरपुड्यानंतर जेवणावळीला जी सुरुवात झाली ती थेट संध्याकाळीच थांबली. विशेष म्हणजे कुठेही कमी पडलं नाही, इतका स्वयंपाक करण्यात आला होता. जेवणाच्या मेनूमध्ये पुऱ्या, बटाट्याची भाजी, वांग्याचं भरीत, मसाल्याचं वरण, साधं वरण, मसालेभात, साधा भात, पापड, लोणचे, कोशिंबीर, गुलाबजाम, जिलेबी, करंज्या, कुरडया, भजी... काय काय म्हणू नको, सर्व सर्व काही होतं. लोक भरपेट जेवली.
लग्नासाठी गोरज मुहूर्त काढला असल्याने वातावरण खूपच आल्हाददायक होतं. तू वरधाव्याला निघालास तेव्हा वाजन्त्रीची दोन पथके पुढे होती. त्यांच्या कोंडाळ्यात नृत्य करण्यासाठी स्थानिक मुलं मुली आणि तुझे मित्र वगैरे यांच्यात अहमहिका लागली होती. मिरवणूक हळूहळू पुढे सरकत होती आणि चौकाचौकात कोण हा भाग्यवान मुलगा म्हणून तुला पहायला व तुझ्यापुढे नाचायला जमलेली गर्दी दाटीवाटीने उभी होती. नाचणाऱ्या व्यक्तींना थम्सअप, कोकाकोला, मिरिंडा काय लागेल ते मिळत होतं. तुम्ही मनसोक्त नाचा, तुमचा शीण आम्ही घालवतो. असं धोरण पप्पांनी आयोजित केलं होतं. माझे दोन्ही भाऊ त्यावर देखरेख ठेवीत होते. कोणाला शीतपेय मिळालं की नाही ते आवर्जून विचारीत होते. अशी चंगळ मला नाही वाटत आमच्या गावात कधी कुणी केली असेल. प्रत्येक ठिकाणी भुईनळे, सप्तरंगी तोटे, फटाक्यांच्या लडी पेटवून दिल्या जात होत्या.
लग्नघटिका जवळ आली तरीही तुझा पत्ता नव्हता इतकी ती मिरवणूक रेंगाळत होती. अखेर मंडपाच्या दाराशी तू आलास. तुझं स्वागत करायला पुन्हा महिलांची झुंबड उडाली. प्रवेश द्वारापासून रंगमंदिरापर्यंत शामियाना उभारलेला होता. दोन्ही बाजूंनी गुलाबजलाचा सुगंधित शिडकावा करणारे पंखे भरारत होते. खाली मऊ पायघड्या होत्या. तुझं स्वागत पायघड्या घालून करावं असं पप्पांनी ठरवलंच होतं. प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला एका छोट्या वेलवेटच्या बटव्यात अक्षता व गुलाबपाकळ्या उधळण्यासाठी दिल्या जात होत्या. त्यासोबत एक कॅलेंडर दिले जात होते, ज्यावर आमच्या होलसेल वा किरकोळ दुकानाची आकर्षक जाहिरात केली होती. कित्येक हजार लोकांपर्यंत पप्पांचं नाव पोचणार होतं...
मुख्य स्टेजवर येतांना, मी व तू बरोबरीने चालत असतांना, सनईसुरात पावले टाकतांना कितीतरी नजरा आपल्यावर खिळल्या होत्या. मी तर पुरती हरखून गेले होते. आपल्या लग्नाला न भूतो न भविष्यति असा अलोट जनसागर लोटला होता. रंगमंदिरही अपुरे ठरले इतकी तोबा गर्दी उसळली होती. स्टेजच्या मागील भिंत तर पूर्णतः फुलांनी सजविलेली होती. त्यावर तुझं नी माझं नाव आकर्षक थर्माकोलने रेखलेलं होतं. ठरल्या मुहुर्तापेक्षा अर्धा तास उशीरा म्हणजे सात वाजून पस्तीस मिनिटांनी मंगलाष्टका सुरु झाल्या. त्या म्हणण्याकरिताही अनेकजण पुढे येतच राहिले. वीस पंचवीस मंगलाष्टका कुणाच्या लग्नात म्हटल्या गेल्याचं मलातरी आठवत नाही बघ. आणि ‘आता सावध सावध..’ सुरु केल्यावर तर सर्वजण उभे राहून टाळ्या पिटू लागले. आकाशात नयनरम्य आतषबाजी सुरु झाली. कितीतरी वेळ रात्रीच्या अवकाशात उंच जाऊन विखुरणारे फटाके उडत होते. आपल्या अंगावर अक्षता आणि गुलाब पाकळ्यांचा अक्षरशः वर्षाव होत होता. आपल्याला भेटी द्यायला, हस्तांदोलन करून शुभेच्छा द्यायला, अभिनंदन करायला भली मोठी रंग लागली. ती संपता संपत नव्हती. फोटो, व्हिडीओ शुटींग, कॅमेऱ्याचे फ्लश.. मी एखादी सेलिब्रेटी असल्याचा भास होत होता...
‘असे लग्न होणे नाही’ असं पुटपुटत जो तो आपापल्या घरी परतत होता...

1 comment:

  1. छान लिहितेस..पुढचे भाग येऊ दे लवकर

    ReplyDelete